महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला मिळणारा १५०० रुपयांचा हप्ता अद्यापही जुलै महिन्यासाठी त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, हा हप्ता ऑगस्टच्या ५ तारखेपर्यंत मिळेल, अशी माहिती सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जुलै हप्त्याची प्रतीक्षा
गेल्या वर्षी सुरू झालेल्या या योजनेचा दुसरा वर्ष चालू असून, यावर्षीचा पहिला हप्ता – म्हणजेच जुलै महिन्याचा – अद्यापही बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. मात्र, सरकारकडून तो लवकरच देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे मासिक अनुदान ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत सहभागी असलेल्या महिलांसाठी एकप्रकारचे मासिक वेतनच आहे, आणि ते दर महिन्याच्या अखेरीस किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिले जाते.
२ कोटी ३४ लाख महिलांना लाभ
ही योजना राज्यात जून २०२३ मध्ये सुरू झाली होती. त्यावेळी २ कोटी ३४ लाख महिलांना पहिला हप्ता मिळाला होता, आणि त्यानंतर ही संख्या बदलत राहिली. २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळतो.
छाननी प्रक्रिया निवडणुकीनंतर
या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक सुमारे ५०,००० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे सरकारने योजनेतील लाभार्थ्यांची छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात उत्पन्न मर्यादा ओलांडणाऱ्या महिलांना अपात्र ठरवले जाईल. विशेषतः अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांची माहिती केंद्रीय अर्थ खात्याकडून मागवण्यात आली आहे.
मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता, ही छाननी प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आली आहे. निवडणुका संपेपर्यंत योजनेत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाईल, त्यानंतरच छाननीची प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाईल.