एका गावात एक हत्या झाल्यानंतर ३०० लोकांना गाव सोडावे लागले होते. त्यानंतर 12 वर्षांनी IPS अधिकाऱ्याने गावकऱ्यांची घरवापसी केली आहे. नेमकं झालं काय जाणून घ्या…
गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील एका गावात सुमारे 29 कुटुंबे गेल्या 11 वर्षांपासून आपली घरे आणि शेती पाहण्यासाठी आसुसली होती. मात्र, एका तरुण IPS अधिकाऱ्याच्या प्रयत्नांमुळे हे सर्व कुटुंब पुन्हा आपल्या गावात परतले आणि त्यांच्या ओसाड पडलेल्या अंगणात पुन्हा हास्याचा किलबिलाट सुरू झाला. या कुटुंबांची वर्षानुवर्षे पडीक असलेली शेती आता पुन्हा हिरवीगार होऊ लागली आहे. या सर्व कुटुंबांना त्यांच्या गावातून हद्दपार करण्यात आले होते, त्यानंतर ते इतर ठिकाणी मजुरी करत जीवन जगत होते.
11 वर्षांपूर्वी घडली होती घटना
बनासकांठा येथील आदिवासी भागातील मोटा पीपोदरा गावात 11 वर्षांपूर्वी 29 कुटुंबांतील सुमारे 300 लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला होता. येथे ‘छडोतरा’ नावाच्या पारंपरिक आदिवासी न्यायप्रणालीअंतर्गत या लोकांना रातोरात गाव सोडण्यास भाग पाडले गेले. ही प्रणाली गावात शांतता आणि न्याय राखण्यासाठी बनवली गेली होती, परंतु याच प्रणालीमुळे 29 कुटुंबांना एका झटक्यात गावाबाहेर काढण्यात आले.
2014 मध्ये सुरू झाले होते प्रकरण
खरं तर, मोटा पीपोदरा गावात 2014 मध्ये हा प्रकार सुरू झाला होता, जेव्हा गावात एका खुनाची घटना घडली. एका मेजवानीदरम्यान वाद झाला आणि या वादातून एका व्यक्तीचा खून झाला. हा खून करणारा व्यक्ती कोडरवी समुदायाचा होता. त्यामुळे खुनाच्या आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली. छडोतरा परंपरेनुसार, कोडरवी समुदायासमोर दोन पर्याय ठेवण्यात आले: एकतर पीडित पक्षाला ‘ब्लड मनी’ म्हणजेच खुनाच्या बदल्यात नुकसानभरपाई द्यावी किंवा गाव सोडून जावे.
300 लोक एका रात्रीत बेघर
यामुळे कोडरवी समुदायाने गाव सोडण्याचा पर्याय निवडला. या गावात कोडरवी समुदायाची 29 कुटुंबे होती. दुसऱ्या पर्यायानुसार, सर्व कुटुंबांना रातोरात गाव सोडावे लागले. यामुळे 300 लोक एका झटक्यात बेघर झाले. ते इतर शहरांमध्ये जाऊन स्थायिक झाले. या काळात त्यांची शेतीही पडीक पडली होती. समुदायातील लोकांनी गावात परतण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत.
ASP सुमन नालाला मिळाली माहिती
आता एका IPS अधिकाऱ्याच्या, सुमन नाला यांच्या, प्रयत्नांमुळे या कुटुंबांची घरवापसी झाली आहे. सुमन नाला या गुजरात कॅडरमधील बनासकांठा येथील दांता येथे सहायक पोलीस अधीक्षक (ASP) म्हणून कार्यरत आहेत. त्यांना या प्रकरणाची माहिती त्यांच्या घरी काम करणाऱ्या नोकराणीकडून मिळाली. एकदा सुमन नाला यांनी आपल्या नोकराणीला विचारले की, “तू तुझ्या गावी का जात नाहीस?” तेव्हा त्या महिलेने त्यांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली आणि सांगितले की, तिचे आई-वडीलही त्या 300 लोकांपैकी होते, ज्यांना गावातून हद्दपार करण्यात आले होते.
आरोपी 2017 मध्येच निर्दोष सुटला
महिलेचे म्हणणे ऐकून सुमन नाला थक्क झाल्या. त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला, तेव्हा समोर आले की, खुनाचा आरोपी 2017 मध्येच निर्दोष सुटला होता आणि तो गावात परतला होता. परंतु बाकीचे लोक अजूनही ही शिक्षा भोगत होते आणि इकडेतिकडे भटकत होते. यानंतर सुमन नाला यांनी बनासकांठा येथील पोलीस अधीक्षक अक्षयराज माकवाना आणि हडद येथील पोलीस उपनिरीक्षक जयंती देसाई यांच्यासह एक मोहीम सुरू केली आणि दोन्ही समुदायातील लोकांशी चर्चा केली.
वर्षांनंतर घरवापसी
त्यांनी मोटा पीपोदरा गावातील पंचांशी बैठक घेतली. एक-दोन नव्हे, तर सलग 20 दिवस बैठका झाल्या. अखेरीस निर्णय झाला की, गावात शांतता राखली जाईल आणि त्या कुटुंबांना परत गावात आणले जाईल. यानंतर हे लोक आपल्या गावात परतले तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणि डोळ्यांत आनंदाश्रू होते. वर्षांनंतर आपल्या गावात परत येऊन लोक भावनिक झाले. 29 कुटुंबांपैकी दोन कुटुंबांसाठी नवीन घरे बांधण्यात आली, तर उर्वरित कुटुंबांची घरे पंतप्रधान आवास योजना आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने बांधली जाणार आहेत.