नागपूरमध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या गाजलेल्या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अभिनेता बाबू छत्री यांच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली असून, संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बाबू छत्री आणि त्याचा मित्र दारूच्या नशेत होते. त्याचदरम्यान दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात मित्रानेच बाबू छत्रीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलीसांनी आरोपी मित्राला ताब्यात घेतले असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
बाबू छत्री यांनी ‘झुंड’ चित्रपटात झोपडपट्टीतल्या युवकाची भूमिका साकारली होती. त्यांच्या प्रभावी अभिनयामुळे प्रेक्षक आणि समीक्षक दोघांच्याही त्यांनी मन जिंकले होते. या चित्रपटामुळे त्यांना बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची अनोखी संधी मिळाली होती, ज्यामुळे ते चर्चेत आले.
त्यांच्या अचानक मृत्यूमुळे चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांमध्ये दुःखाचं वातावरण पसरलं आहे. नागपूर पोलिसांकडून या प्रकरणातील सर्व पैलूंची चौकशी सुरू असून, घटनेमागील नेमकं कारण समोर येण्याची प्रतीक्षा आहे.