राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले असून, या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने बहुसंख्य ठिकाणी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. अनेक महापालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, मुंबईतही महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका फोन कॉलची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकांकडे विशेष लक्ष लागून होते, त्यातही मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वाधिक चर्चेत होती. गेल्या अनेक दिवसांपासून ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मुंबई जिंकण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकद पणाला लावली होती. मोठ्या सभा, कॉर्नर बैठका, रॅली, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखती आणि थेट संवाद असा सर्वांगीण प्रचार भाजपाकडून करण्यात आला होता. या रणनीतीचा परिणाम आता निकालांमध्ये दिसून येत आहे.
मुंबई महापालिकेत भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महायुतीने स्पष्ट आघाडी घेतली असून, उद्धव ठाकरे यांच्या तब्बल 25 वर्षांच्या सत्तेला यामुळे मोठा धक्का बसला आहे. मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर महायुतीची सत्ता निश्चित झाल्याचे चित्र आहे.
फडणवीसांचा तो फोन कॉल नेमका कोणाला?
मुंबईतील निकाल जवळपास स्पष्ट होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने एक फोन कॉल केला. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन कॉल मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांना करण्यात आला. निवडणूक काळात अमित साटम यांनी मुंबईत भाजपासाठी आक्रमक प्रचार करत संपूर्ण शहर पिंजून काढले होते. ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीकेला त्यांनी सातत्याने प्रत्युत्तर दिले होते.
मुंबईतील विजय स्पष्ट झाल्यानंतर फडणवीस आणि अमित साटम यांच्यातील हा संवादाचा व्हिडीओही समोर आला असून, त्याची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
कॉलमध्ये फडणवीस काय म्हणाले?
या फोन कॉलदरम्यान देवेंद्र फडणवीस अमित साटम यांचे मनापासून अभिनंदन करताना दिसतात.
“अमित, तुमचं खूप खूप अभिनंदन. नाही नाही, खूप चांगलं झालं आहे. आता काहीही चिंता करायचं कारण नाही. तुम्ही फार सुंदर काम केलं. खूप अभिनंदन. आता आपण जबरदस्त करूया,” असे शब्द फडणवीस यांनी या संभाषणात वापरले आहेत.
या संवादामुळे भाजपातील नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई महापालिकेचा निकाल काय सांगतो?
मुंबई महापालिकेच्या एकूण 227 जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यापैकी सुमारे 95 जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे सुमारे 30 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. ठाकरे गटाला एकूण सुमारे 75 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अंदाजे 66 जागा मिळू शकतात.
मनसेला सुमारे 9 जागा मिळण्याची शक्यता असून, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला मिळून 15 पेक्षा अधिक जागा मिळू शकतात. इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवार सुमारे 11 जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे.
राज्यातील या निकालांनंतर आता महापालिका राजकारणात नवी समीकरणे आकाराला येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषतः मुंबईतील सत्ता परिवर्तनामुळे आगामी काळातील राज्याच्या राजकारणावर याचे मोठे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
