मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले याचा मला आनंद आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने आज मराठा समाजाच्या हितासाठी चांगला तोडगा काढला याचाही मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मनोज जरांगे यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केले असून आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू केले जाईल. राज्य सरकारने तसा जीआर काढला आहे. सरकारच्या या जीआरनंतर आता मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे. आता जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता मराठा समाजाचे मुंबईतील आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या या शिष्टाईचे श्रेय त्यांनी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीला दिले आहेत. मी प्रत्येक समाजासाठी काम करत राहील, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.
सरसकट कुणबी प्रमाणत्र देण्यास कायदेशीर अडचणी होत्या
मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले याचा मला आनंद आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने आज मराठा समाजाच्या हितासाठी चांगला तोडगा काढला याचाही मला आनंद आहे. जरांगे यांचे उपोषण आता संपलेले आहे. खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी आमची सुरुवातीपासूनच तयारी होती. पण मनोज जरांगे यांची सरसकट कुणबी प्रमाणत्र द्यावे या मागणीला कायदेशीर अडचणी होत्या. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निर्णय लक्षात घेता सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नव्हते, अशी पहिली प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मनोज जरांगेंनी भूमिका समजून घेतली, त्यानंतरच…
हीच वस्तूस्थिती जरांगे यांच्या टीमच्या लक्षात आणून देण्यात आले. आपल्या कायद्याप्रमाणे, देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नव्हे तर व्यक्तीला मिळत असते. संबंधित व्यक्तीने ते आरक्षण मागायचं असायचं. म्हणूनच सरसकट आरक्षण कायद्याच्या पताळीवर टिकणार नाही, हे जरांगे यांच्या टीमला सांगण्यात आले. जरांगे यांनीदेखील ही भूमिका समजून घेतली. कायद्यात सरसकट आरक्षण बसत नसेल तर ते करू नका असे जरांगे यांनी सांगितले. त्यानंतर मंत्रिमंडळ उपसमितीने चर्चा केली आणि जीआर तयार झाला, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राजकारणात टीका होतच असतात, मी काम…
जरांगे यांच्या इतरही काही मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे एकूणच पहिल्यांदा राधाकृष्ण विखे पाटील, मंत्रिमंडळ समितीतील सर्व सदस्यांचे मला अभिनंदन करायचे आहे, असेही यावेळी फडणवीस यांनी म्हटले. आपल्या उपोषणादरम्यान मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर टोकाची टीका केली होती. त्यावरही राजकारणात टीका होत असतात. पण मी समाजासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी काम करतच राहणार असे फडणवीस यांनी म्हटले आहे.