कल्याण | 21 जुलै 2025: कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयात घडलेल्या धक्कादायक प्रकारात, मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करणाऱ्या गोकुळ झा या परप्रांतीय आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, त्याचे फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गोकुळ झा याला आज काही वेळापूर्वी कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्याने कोर्टातच गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वतःवर लादण्यात आलेले आरोप फेटाळले असून, विनाकारण या प्रकरणात आपल्याला गोवण्यात आल्याचं सांगितलं. मात्र, न्यायालयाने त्याचं म्हणणं फेटाळून त्याला चांगलंच फटकारलं आणि दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
घटनेचा तपशील
सदर घटना कल्याणमधील एका प्रसिद्ध खाजगी रुग्णालयात घडली. गोपाल झा नावाच्या व्यक्तीला डॉक्टरांना भेटायचं होतं. मात्र, त्या वेळी डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये काही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह (MR) आधीपासूनच उपस्थित होते. रिसेप्शनवर असलेल्या मराठी तरुणीने त्याला काही वेळ थांबण्यास सांगितले. यावरून गोपाल झा आणि रिसेप्शनिस्ट यांच्यात वादावादी झाली.
वाद वाढल्यावर गोपाल झा रागाच्या भरात बाहेर गेला आणि पुन्हा धावत येऊन संबंधित तरुणीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. सदर प्रकार घडल्यानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आणि सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांची कारवाई
मारहाणीनंतर लगेचच पोलिसांनी आरोपी गोकुळ झा याला अटक केली. आज न्यायालयात त्याला हजर करण्यात आलं असता, न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुरावे गोळा केले जात आहेत.
समाजात संतापाचा सूर
या घटनेनंतर स्थानिक मराठी समाजात संतापाची लाट पसरली असून, परप्रांतीयांच्या वर्तणुकीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. रुग्णालय प्रशासनाकडून या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.