राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले असून, अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले वर्चस्व राखले आहे. मात्र या निकालांमध्ये आता एका वेगळ्याच मुद्द्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे एमआयएमने केलेली लक्षवेधी कामगिरी.
15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतरच्या मतमोजणीत बहुतेक महापालिकांमध्ये भाजपाने आघाडी घेतल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबई महापालिकेत भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेची सत्ता येण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. पुण्यात भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून, छत्रपती संभाजीनगर महापालिकेतही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
असे असतानाच, या निवडणुकीत एमआयएम पक्षाने राज्यभरात मिळवलेल्या यशामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मालेगाव, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नांदेड यांसारख्या शहरांमध्ये एमआयएमचे उमेदवार निवडून आल्याने या पक्षाची उपस्थिती अनेक महापालिकांमध्ये ठळकपणे दिसून येत आहे. यासोबतच समाजवादी पक्षानेही काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.
राज्यात एमआयएमची किती ताकद वाढली?
राज्यभरात एमआयएमचे एकूण 74 उमेदवार निवडून आले आहेत. मुंबईत एमआयएमचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत या पक्षाचे तब्बल 24 नगरसेवक निवडून आले असून, ही संख्या लक्षवेधी मानली जात आहे. अमरावतीत एमआयएमचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत.
मालेगाव महापालिकेत एमआयएमने 20 जागांवर विजय मिळवला असून, येथे हा पक्ष सर्वाधिक जागा जिंकणारा ठरण्याची शक्यता आहे. नांदेड महापालिकेत एमआयएम दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरू शकतो. येथे 14 नगरसेवक एमआयएमकडून निवडून आले आहेत. धुळे महापालिकेतही एमआयएमने आठ जागांवर विजय मिळवला असून, जालना महापालिकेत दोन जागांवर या पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
समाजवादी पक्षाचीही ठळक उपस्थिती
समाजवादी पक्षानेही काही शहरांमध्ये आपली छाप पाडली आहे. विशेषतः मालेगाव महापालिकेत समाजवादी पक्षाचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे या शहरात बहुपक्षीय राजकारण अधिक ठळक होताना दिसत आहे.
एमआयएमने प्रामुख्याने मुस्लीमबहुल भागांमध्ये उमेदवार उभे केले होते आणि त्यांना अपेक्षित यश मिळाल्याचे चित्र आहे. मुंबईपासून मालेगाव, नांदेडपर्यंत या पक्षाचे प्रतिनिधी निवडून आल्याने, एमआयएमची राज्यातील राजकीय ताकद वाढल्याचे मानले जात आहे.
महापालिका निवडणुकांमधील या निकालांनंतर आता पुढील टप्प्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी एमआयएम आणि समाजवादी पक्ष कोणती रणनिती आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात नवे समीकरण उभे केल्याचे स्पष्ट झाले आहे.
