दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस भारतात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला मराठी भाषा दिन असेही म्हटले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस हा दिवस खूप उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो. याच मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषिकांना एक अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे.
सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence – AI) युगात मराठी भाषेला सक्षम आणि शक्तिशाली करण्यासाठी मराठी भाषिकांनी जास्तीत जास्त उच्च दर्जाचा डेटा (Data) निर्माण करावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मराठी भाषेसह एआय डिजीटल माध्यम यावर भाष्य केले आहे. यावेळी राज ठाकरेंनी डेटाचे महत्त्व सांगितले आहे. “जमिनीत शेती शोधल्यापासून ते औद्योगिक क्रांतीपर्यंत शक्तीचे स्रोत बदलत गेले. डिजिटल युगात डेटा ही सर्वात मोठी शक्ती आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात ज्या भाषांमधून जास्तीत जास्त डेटा तयार होईल, ती भाषा शक्तिशाली ठरेल”, असे राज ठाकरे म्हणाले.
यावेळी राज ठाकरेंनी मराठी भाषिकांना ५ मुख्य सल्ले दिले आहेत. मराठी भाषा डिजिटल जगात ज्ञानाची वाहक बनवायची असेल तर त्यांनी काही उपाय सुचवले आहेत.
कोडिंग आणि तंत्रज्ञान: मराठीत उत्तम दर्जाचा डेटा तयार करून AI प्रणालींना समृद्ध करा, जेणेकरून भविष्यात उत्तम संधी मराठीत उपलब्ध होतील.
समाज माध्यमांवर मराठीचा वापर: सोशल मीडियावर जास्तीत जास्त मराठीत व्यक्त व्हा. मात्र, टीका किंवा द्वेष पसरवण्याऐवजी सकारात्मक माहिती टाका.
ब्लॉग आणि पॉडकास्ट: तुम्ही ज्या क्षेत्रात तज्ज्ञ आहात, त्या क्षेत्रातील माहिती मराठीतून ब्लॉग्स किंवा पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा.
डिजिटल विश्वकोश: मराठी भाषिकांनी पुढाकार घेऊन डिजिटल विश्वकोश तयार करावेत.
शिक्षण प्रणालीत AI: शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ती हाताळण्याची कला मराठीतून शिकवली जावी.
मराठी माणूस स्वतःचे मोठे साम्राज्य उभे करू शकतो
या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी अँथ्रोपिक (Anthropic) कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी राहुल पाटील यांचा उल्लेख केला. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या कमी होण्याची भीती असली, तरी या तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी माणूस स्वतःचे मोठे साम्राज्य उभे करू शकतो. आता आपल्याला मराठी भाषेतून ज्ञान मिळवण्याबाबतचे सार्वभौमत्व मिळवणे शक्य आहे, ही संधी सोडू नका, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.

