अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लग्नबंधनात अडकले आहेत. 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी उदयपूरमध्ये धूमधडाक्यात लग्न केलं.

या लग्नसोहळ्याचे फोटो रश्मिका आणि विजयने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पारपंरिक दाक्षिणात्य पद्धतीनुसार हा विवाहसोहळा पार पडला आणि त्यानुसारच या दोघांचा पोशाख होता.

सहसा लग्नसोहळ्यात वधूवर सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात. परंतु यावेळी रश्मिका तर सुंदर दिसतच होती, पण तिच्यापेक्षाही जास्त कौतुक विजयच्या लूकचं झालं. सोशल मीडियावर सध्या त्याच्याच लूकची चर्चा आहे.

हातावर आल्ता, भरजरी दागिने, कमरपट्टा, बाजूबंद.. अशा अत्यंत पारंपरिक अंदाजात विजय दिसून आला. त्याने धोती आणि त्यावर शॉल परिधान केला होता. दाक्षिणात्य वर म्हणून विजय अत्यंत सुंदर दिसत होता, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

विजय आणि रश्मिका यांच्या या पारंपरिक लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. ‘गीता गोविंदम’ आणि ‘डिअर कॉम्रेड’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी काम केलंय.

उदयपूरमध्ये या लग्नसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. आधी आंध्र आणि त्यानंतर कोडाव पद्धतीने या दोघांनी लग्न केलं.

