मुंबई : बहुप्रतिक्षित आणि लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझी ‘हेरा फेरी 3’ सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या चित्रपटातून अभिनेता परेश रावल यांनी अचानक माघार घेतल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. आता स्वत: परेश रावल यांनी सोशल मीडियावर या संपूर्ण प्रकरणावर खुलासा करत मौन सोडलं आहे.
परेश रावल यांनी त्यांच्या एक्स (माजी ट्विटर) हँडलवर पोस्ट करत लिहिलं, “योग्य कारणांमुळे रद्द झालेला माझा करार आणि चित्रपटातून बाहेर पडण्याबाबत माझ्या वकिलांनी योग्य उत्तर दिलं आहे. एकदा ते उत्तर वाचलं की सर्व समस्या मिटतील.” त्यांच्या वकिलांचं नाव अमित नाईक असून ते अमिताभ बच्चन आणि अनिल कपूर यांचेही कायदेशीर सल्लागार राहिले आहेत.
यापूर्वी अभिनेता अक्षय कुमार, जो या चित्रपटाचा निर्माता सुद्धा आहे, याने परेश रावल यांना कायदेशीर नोटीस बजावली होती. या चित्रपटाच्या ट्रेलरचे काही भाग आधीच शूट झाले होते आणि साइनिंग करारानुसार परेश रावल यांना ₹१५ कोटी मानधन मिळणार होते, त्यातील ₹११ लाख साइनिंग अमाऊंट आधीच देण्यात आली होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार, परेश रावल यांनी ही रक्कम व्याजासह परत केली आहे.
अक्षय कुमारच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, “परेश रावल यांच्या माघारीमुळे चित्रपटाचे आर्थिक आणि व्यवस्थापनाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक क्रू मेंबर्स, लॉजिस्टिक्स, आणि ट्रेलर शूटिंगवर आधीच खर्च झाला आहे. त्यामुळे त्यांच्या या कृतीचे कायदेशीर परिणाम होतील.”
याआधी जानेवारीमध्ये परेश रावल यांनी सोशल मीडियावर ‘हेरा फेरी 3’ मध्ये सहभागी होण्याची पुष्टी केली होती. चित्रपटाचा सुमारे साडेतीन मिनिटांचा भाग शूटही झाला होता. मात्र, अचानक त्यांनी माघार घेतल्याने टीमला मोठा धक्का बसला होता. अक्षय कुमारने त्यांच्या कायदेशीर टीममार्फत सात दिवसांत उत्तर देण्याची मागणी केली होती, ज्याला आता उत्तर मिळाले आहे.
आता पुढील पावलं अक्षय कुमार आणि त्याची टीम काय उचलते, याकडे संपूर्ण इंडस्ट्रीचं लक्ष लागलं आहे.