धाराशीव | महाराष्ट्र: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं आणि स्पष्ट विधान केलं आहे. “भाजपा वगळता आम्ही कोणत्याही पक्षाशी युतीस तयार आहोत,” असं सांगून त्यांनी राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण केली आहे. हे विधान त्यांनी धाराशीव येथे माध्यमांशी बोलताना केलं.
सध्या महाराष्ट्रातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर होण्याच्या तयारीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चार महिन्यांत निवडणुका घ्याव्यात असा आदेश आल्याने, निवडणूक आयोगासह सर्व पक्षांनी कंबर कसलेली आहे.
वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट, भाजपावर ‘नो अलायन्स’ भूमिका
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केलं की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडी भाजपा वगळता इतर कोणत्याही पक्षाशी युतीस तयार आहे.” त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीचे (शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट)) काय उत्तर येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आगामी निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे पक्षपातळीवर सखोल आढावा घेतला जाणार असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. लवकरच त्या निर्णयानुसार भूमिका ठरवली जाईल, असं ते म्हणाले.
महाविकास आघाडीची रणनीती बदलणार का?
वंचित बहुजन आघाडी हा राज्यातील एक महत्त्वाचा दलित आणि बहुजन मतदारधारक असलेला पक्ष आहे. त्यामुळे त्यांची रणनीती इतर आघाड्यांसाठी महत्त्वाची ठरते. प्रकाश आंबेडकरांनी जर महाविकास आघाडीशी हातमिळवणी केली, तर अनेक महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकांचे गणित बदलू शकते.
राज्यातील निवडणूक चित्र: कोण कुठे उतरणार?
राज्यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या महापालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत. याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायती व ग्रामपंचायतींमध्येही निवडणुका जाहीर होतील. अनेक पक्षांनी यासाठी स्थानिक तसेच राज्य पातळीवर युतीचा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे.