राज्याच्या राजकारणातून एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. शशिकांत शिंदे यांची शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) नव्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर कोणाची नियुक्ती होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. अखेर आज यावर शिक्कामोर्तब झाले असून खुद्द खासदार शरद पवार यांनीच शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे.
मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये झाली निर्णयाची घोषणा
आज मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीस शरद पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती होती.
या बैठकीदरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. सुनील भुसारा, उत्तम जानकर आणि खासदार अमोल कोल्हे यांनी यास अनुमोदन दिले. सर्वानुमते हा प्रस्ताव संमत करण्यात आला. त्यानंतर शरद पवारांनी अधिकृतपणे शिंदे यांच्या नावाची घोषणा केली.
जयंत पाटलांनी मागितली होती जबाबदारीतून मुक्तता
काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी आपल्या जाहीर भाषणात प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी लवकरच नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा केली जाईल, असे स्पष्ट केले होते.
याच पार्श्वभूमीवर आता शशिकांत शिंदे यांची नेमणूक झाल्याने पक्षात नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता आहे.
शशिकांत शिंदे यांच्यापुढे नवे जबाबदारीचे आव्हान
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना शशिकांत शिंदे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला नव्या उंचीवर नेणे, संघटन बळकट करणे आणि जनतेचा विश्वास मिळवणे — ही त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी ठरणार आहे.
त्यांच्या कार्यशैलीवर आणि संघटन कौशल्यावर पक्षाचा भविष्यातील यश अवलंबून राहणार आहे.