21 जुलै 2025 | जनवृत्त प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणात सध्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असून, महायुतीतील महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. संख्याबळाच्या आधारे हे वाटप करण्यात येणार असून, तीनही पक्षांमध्ये या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याचे सांगितले जात आहे.
कोणाला किती महामंडळं?
सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाला (भाजप) ४४, शिवसेना (शिंदे गट) ला ३३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला २३ महामंडळं देण्यात येणार आहेत. महायुतीमधील समन्वय समितीच्या बैठकीत हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला असून, लवकरच यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.
उदय सामंत यांची प्रतिक्रिया
या संदर्भात शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांना विचारणा करण्यात आली असता, “अशी कोणतीही माहिती अद्याप माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्यांनी पुढे असेही नमूद केले की, “येणाऱ्या महिन्याभरात महायुतीचा महामंडळ वाटप फॉर्म्युला निश्चित होईल.”
नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न?
महामंडळ वाटपाच्या या हालचालींचे एक मुख्य कारण म्हणजे महायुतीतील नाराज आमदारांची नाराजी दूर करणे असल्याचेही बोलले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांपूर्वी ही नाराजी थोपवण्यासाठी पक्षीय समन्वय समिती सक्रिय झाली आहे.
सिडको व म्हाडा वाटपावर रस्सीखेच
दरम्यान, सिडको (CIDCO) आणि म्हाडा (MHADA) यांसारख्या महत्त्वाच्या महामंडळांवर अजूनही भाजप आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या महामंडळांवर ताबा मिळवण्याचे राजकीय वजन प्रत्येक गटासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.