पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पडद्यामागे प्रचंड राजकीय घडामोडी सुरु आहेत. पुणे महापालिका निवडणुकीत कुणाची युती आणि कुणाची आघाडी होईल? याकडे सर्वांचं लक्ष आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत एकत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे पुण्यात दोन्ही पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा प्रश्न सुटला. तसेच निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजपची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती होईल, असं जाहीर केलं होतं. पण इथे जागावाटपावरुन शिवसेना आणि भाजपचं पूर्णपणे ठरलेलं नाही. तर दुसरीकडे महायुतीतला तिसरा घटकपक्ष फडणवीसांच्या घोषणेनंतर एकटा निवडणुकीला सामोरं जाणार असल्याची माहिती समोर आली. पण यानंतर वेगळ्या घडामोडी पुण्यात घडताना दिसल्या.
पुणे जिल्हा आणि अजित पवार यांचं वेगळं नातं आहे. ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. त्यांचा तो बालेकिल्ला आहे. असं असलं तरी भाजप आणि शिंदेंची शिवसेना हे एकत्र निवडणूक लढणार असल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पुढे मोठं चॅलेंज आहे. अशा काळात आपल्या समविचारी पक्षांना सोबत घेणं हा या पर्यायाचा अजित पवारांची राष्ट्रवादी विचार करु लागली.
यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा समोर आली. हीच चर्चा आगामी काळात खरी होण्याची शक्यता मानली जात आहे. याबाबत थेट घोषणा होऊ शकते किंवा दोन्ही राष्ट्रवादींमध्ये परस्पर सहमतीने उमेदवार दिले जाऊ शकतात, अशी चर्चा समोर आली.
एकीकडे या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा समोर आल्याने महाविकास आघाडीत मोठा गोंधळ उडताना बघायला मिळाला. विशेष म्हणजे ठाकरे बंधू तर एकत्र येताना दिसत आहेत. त्यांची पुण्यातही युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे नेते आणि पदाधिकारी विचारात पडले. आघाडीत लढायचं की स्वतंत्र लढायचं याबाबतचं द्वंद्व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये होता.
विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढण्यास विरोध करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार असल्याचं जवळपास फिक्स असल्याची चर्चा आहे. पण त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यानंतर आता काँग्रेसनेदेखील मोठा निर्णय घेतला आहे.
पुणे महापालिका निवडणूक स्वबळार लढवायची, असा निर्णय आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी काँग्रेस पुणे महापालिका स्वबळावर लढणार असल्याची माहिती दिली. “पक्षश्रेष्ठींचा निरोप आला आहे, पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करू नका. ठाकरे आणि इतर कोणी येत असेल तर चर्चा करा. मात्र अजित पवारांशी युती करू नका”, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली. काँग्रेसच्या या निर्णयाने आता अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या युतीचा मार्ग मोकळा झाल्याचीदेखील चर्चा आता शहरात होऊ लागली आहे.
समविचारी पक्षांना सोबत घेऊन पुणे महापालिकेची निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आम्ही आघाडी करणार नाहीत. शिवसेनेसोबत युती आघाडीसंदर्भात चर्चा सुरू आहे. ठाकरेंनी त्यांच्या कोट्यातून मनसेला जागा द्याव्यात असा प्रस्ताव दिला आहे”, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’शी बोलताना दिली आहे.

